Wednesday 11 December 2013

गुंतवणूक आणि गुंतागुन्त

कार्यशाळा संपली की एक अनुभव असा येतो की बरेच जण मला भेटून "आम्हालाही गुंतवणूक शिकवा ओ कशी करतात ती....." इथपर्यंत ठीक आहे मी म्हणतो; पण काही जण म्हणतात "टेक्निकल अन्यालीसीस शिकवा बुवा ते आलेखन (Charting ) आणि काय काय असते ते...." चला शिकवतो पण मग खात्रीने ते तुम्ही आत्मसात कराल ? आणि तुम्हाला बर्या पैकी पैसे मिळतील ? कदाचित मिळतील एखाद्याला पण सर्वांना नक्कीच नाही. कारण ते खूप गुंता गुंतीचे किचकट क्लिष्ट असे आहे आणि त्याही पेक्षा कुठले निकष कुठे आणि कसे वापरायचे ह्याला त्यात बरेच नियम - उपनियम हि आहेत. एवढ्या सगळ्याचे भान आपल्याला (मला तरी )रहात नाही आणि आपण शिकवणार्याला किंवा मार्केटला दोष देतो.
पण सुरुवात कशी करावी ? ह्या प्रश्नाला उत्तर खालीलप्रमाणे 
  • प्रथम एक पक्के करा कि गुंतवणूक करायची आहे की ट्रेडिंग. 
  • जर गुंतवणूक करायची असेल तर किती रुपयांची करायची हा दुसरा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. त्यासाठी स्वतःचे इन्कम सोर्स कोणते महिना / वार्षिक किती पैसे जमा होतात ते लक्षात घेणे आले. त्यानंतर जनरली जमा वजा खर्च = गुंतवणूक हे जे समीकरण आहे ते बदलायला हवे म्हणजे जमा वजा गुंतवणूक = खर्च  (असे का ते पुढच्या लेखात सविस्तर)  
  • आता जर गुंतवणूक करायचीच आहे तर बाजारात गुंतवणुकीची किती माध्यमे उपलब्ध आहेत (होय ...होय हे पण पुढच्या लेखात) त्याच्या अनुषंगाने येणारी जोखीम किती. त्याची सुरक्षितता, मिळणारा परतावा आणि गुंतवणुकीचा कालावधी इथे आणखी एक महत्वाचा उप विचार असा कि हा कालावधी आणि आपले उद्दिष्ट ह्याची सांगड घालता येते आहे का तेही पाहावे. म्हणजे किती काळ पैसे अडकून पडतील ह्याचा विचार करून किंवा माहिती काढून ती टिपून ठेवावी.
  • आपल्याकडे येणारे पैसे आणि बाजारात असलेली गुंतवणूक साधने ह्यांची सांगड घालून आपण जर पैसे गुंतवले तर जास्तीतजास्त परतावा कसा मिळू शकेल हे थोडे फार गणित करून आपला होम वर्क करून आधी आपण जाणून घ्यावे. मग एखाद्या गुंतवणूक तज्ञाचे मार्गदर्शन घ्यावे. गुंतवणूक तज्ञ हा तुमचा वेल्थ सांभाळणारा डॉक्टर आहे तेव्हा त्याला सगळे उलगडून विचारावे आणि सांगावेही.
  •  गुंतवणूक तज्ञ सी ए असण्याची गरज नाही कारण फार कमी सी ए गुंतवणूक मार्गदर्शन करू शकतात कारण बरेच जण कर सल्ला चांगला देतात पण गुंतवणूक विषयक सल्ला नाही असा अनुभव आहे... नियम नाही.

आता जर ट्रेडिंग करायचे आहे तर
  • प्रथम आपल्याकडे असणारे पैसे आणि आपण वर जाणून घेतलेली गुंतवणूक साधने ह्याचा विचार करून त्यात चालणारी ट्रेडिंग सायकल लक्षात घेणे आवश्यक आहे म्हणजे जर तुम्ही सदनिका घेत असाल तर कुठल्या भागात किंमत न्यूनतम पातळीला आहे कुठे किंमत वाढीला वाव आहे हे पाहून आणि त्याला किती कालावधी लागेल ते पाहून ठरवावे. (आत्ता रत्नागिरी,सावंतवाडी, मुंबईजवळ उरण हि चांगली ठिकाणे आहेत.) जर सोन्यात ,शेअर्स मध्ये, antics किंवा इतर कुठल्याही साधनांची निवड करतानाचे निकष वेगवेगळे आहेत.ते पडताळून पाहणे आवश्यक आहे.
  • ट्रेडिंग करताना खरेदीची वेळ हा फार महत्वाचा भाग मी मानतो आणि गुंतवणूकीकरिता कालावधी  आणि उद्दिष्ट फार महत्वाचे  वाटते.
आपल्याला येणारे यश अपयश ह्याला आपणच जबाबदार असतो तेव्हा आपला अभ्यास आपणच करणे गरजेचे आहे. तज्ञांचे मार्गदर्शन घेणे केव्हाही इष्टच पण मार्गदर्शन आणि आंधळेपणाने विश्वास ठेऊन घेतलेला निर्णय ह्यात गल्लत करून हात पोळून घेऊ नयेत. सचिन तेंडूलकरने गाजवलेले पराक्रम,क्रिकेटची सगळी टर्मिनोलोजी जर मला मुखोद्गत आहे, जुनी नाट्यपदे / शाळेतल्या कविता  मला पाठ आहेत, सवाई गंधर्व मी न चुकता जातो आणि गेल्या काही वर्षात कोण काय सुंदर गायले ते सांगू शकतो, राजकारणाचे विश्लेषण,आडाखे पवार ठाकरे कोणाला निवडायचे ते मला समजते, उलट सुलट वाद मी घालू शकतो तर गुंतवणूक विषयक आकडेवारी, निवड, टर्मिनोलोजी  मला समजत नाही हा अत्यंत दुर्दैवी विरोधाभास आहे.

Sunday 8 December 2013

शेअर मार्केट आणि मी

वास्तविक शेअर मार्केट हा सगळ्यांचा वादाचा, समज - गैरसमजाचा असा विषय आहे. पण मला कळलेले मार्केट (जे प्रत्येकाचे वेगवेगळे असणार कारण ते चक्रधर स्वामींच्या दृष्टांतासारखे आहे. )थोडेसे असे की ज्यात दोन प्रकारचे पैसे कमावण्याचे मार्ग लोक ढोबळपणे अवलंबतात. 
अत्यंत किचकट ट्रेडिंग प्रणाली पासून लांब राहून मी माझे काही ट्रेडिंग आणि गुंतवणुकीचे साधे प्रयोग केले ते हि मांडतो आहे. 

तर

१) गुंतवणूक योग्य मार्केट  २) ट्रेडिंग योग्य मार्केट.

दोन्ही पद्धतीच्या मार्केट मध्ये अभ्यास  हा अपेक्षित आहे. म्हणजे जेव्हा मी बाजारात जाऊन वांगी घेऊन येतो तेव्हा ती खराब निघतात आणि बायको बदडून काढून माझ्या पाठीचे भरीत करते. आता तुम्ही म्हणाल की बाजारात वांगी खरेदी करणे आणि एखादा शेअर खरेदी करणे सारखेच का? तर मी म्हणेन होय कारण इथे सुद्धा दोघे आहेत एक विकणारा आणि एक घेणारा. आता घेणारा जर मी असेन जो फारसा कधीही बाजारात जाऊन भाजी घेत नाही आणि घेणारी माझी बायको असेल जी रोज बाजारात जाऊन भाजी खरेदी करते तर विकणारा जो एकाच जागी कित्येक वर्ष बसून भाजी विकतोय तो तुम्हाला लगेच ओळखतो की हा बकरा चांगला आहे आणि त्याची ना खपणारी वस्तू तो तुमच्या गळ्यात मारतो पण बायको हा प्राणी जगात फार हुशार असतो (ती नावारासुद्धा एका नजरेत जोखते हो !)ती भाजी बरोबर पाहून, भाव करून घेते मी भाजीवालीकडे पाहून(हे फार महत्वाचे आहे बरे का!) भाजी घेतो. थोडक्यात मी ज्या चुका तिथे करतो त्याच सर्वत्र करत फिरत असतो त्याला अपवाद एकाच प्रांताचा ज्या प्रांतात मी मुरलेलो आहे. तिथे मला कुणी फसवू शकत नाही (आणि इथे सगळे क्रेडीट मला बर का. आणि तिथे मात्र भाजीवालीने फसवले हो...हल्लीचे भाजीवाले...आणि स्वातंत्रपूर्व काळात वगैरे गप्पा मारायला मी मोकळा ) तर जी गत भाजीवालीकडे  तीच शेअर मार्केटमध्ये. कुणीतरी मला सांगितले हॉट टीप आहे आणि मी घेतले शेअर्स आणि नंतर आपटला की हो शेअर!! झाले मग मार्केट कसे वाईट माणूस कसा फसतो जु   गा   र आहे जू गा    र ..वगैरे वगैरे 

मग मार्केट मध्ये टीप येते ती हॉट असते तरी मला का मिळत नाहीत पैसे : -  ह्याचे विवेचन नको का करायला. मुळात टिप्स ह्या ब्रोकर,ओपेरेटर (च्यायला म्हणजे काय आणि नवीन ?!!) जनरेटेड असतात. म्हणजे मार्केट जर कंपनीच्या आर्थिक निकषांवर चालत असते तर त्यात चढ उतार (आणि आपल्याकडे जरा जास्तच चढ उतार) आलेच नसते किंवा फारतर जेव्हा कंपन्याचे आर्थिक निकाल जाहीर होतात तेव्हाच ते चढ उतार झाले
असते. मग हे गुजराती (पिढ्यानपिढ्या) कमावतील कसे ? 
मग एखादा शेअर जमा करून ठेवायचा असेल तर मार्केटमध्ये वाईट बातमी सोडायची ती बातमी पूर्वी कर्णोपकर्णी पसरत असे आता सी एन बी सी आणि तत्सम तज्ञ आहेत ते करायला तर आपण कुठे होतो हं वाईट बातमी सोडायची  आणि सामान्य माणसाला शेअर्स विका म्हणून सांगायचे (मग त्यांनी विकले ते घेतात कोण?) जेणे करून शेअर्स गडगडले पाहिजेत आता हे गडगडणारे शेअर्स एकट्याने घेणे शक्य नाही मग ग्रुप करून विकत घ्यायचे (इथे हि अनेक प्रकार आहेत) आणि आपला पूर्ण पैसा त्यात लागला की मार्केट मध्ये चागल्या बातम्या सोडायच्या आणि खरेदी करा म्हणून सांगायचे हे करत असतानाही त्यांची गणिते असतात म्हणजे किती रुपये किती काळ गुंतून पडणार आहेत त्यावर किती व्याज मला द्यावे लागणार आहे त्यानुसार शेअरचा भाव ठरलेला असतो त्या भावापर्यंत शेअर पळवत नेला कि लोकांनाही त्या शेअरबद्दल विश्वास निर्माण होतो आणि जिथे हि मंडळी बाहेर पडणार तिथे तुम्ही आम्ही आत जाण्यासाठी धडपडतो. 
ह्या सगळ्यांचे प्रतिबिंब ग्राफ्सद्वारे मांडले जाते पण पडद्यामागचे खेळ सामान्य लोकांपुढे न ठेवता त्याला सपोर्ट-रेझिस्टन्स अशी नावे दिली जातात आणि आणखीन गुंगवले जाते. 

हे सगळे अतिशय जवळून पाहिले असल्याने आणि पार मार्केट रिंग मध्ये काम केल्याने हे खेळ करणाऱ्याबद्दल  मनात राग ठासून भरलेला आहे.(निधड्या छातीचा मराठी मुठी आवळणे आणि रागावणे हेच करू शकतो) पण सर्व अर्थशास्त्र आणि अर्थ क्षेत्र हे मारवाड्यांच्या (होय गुजरात्यांच्यातर अजीबात नाही )हातात का आहे? त्यांच्याकडे पैसे आहेत रे ?आरे मग माझ्या कडे का नाहीत ? तीर्थारुपानी ठेवले नाहीत काय करणार ?आपल्या रक्तातच नाही काय करणार ?  शेअर्स असोत कि मेटल असो किंवा रियल इस्टेट असो.सर्व मारवाड्यांच्या हातात.
                          पण त्यांच्यात राहून मी एक शिकलो कि आपण अभ्यास करतो ते हि अभ्यास करतात पण ते करतात तो वेगळा अभ्यास (ज्याच्या कडे मी काम केले तो तर मला हिणवून हिणवून सांगायचा तू बी कॉम मी आठवी जेमतेम पण मी बघ आणि तू बघ....पण त्यानेच बरेच हिंडवले मला मार्केटमध्ये  अर्थ क्षेत्राची ओळख करून दिली वाणिज्य म्हणजे नुसतेच अकाउंटीग नाही रे हे मला शिकवले ) मी करतो ती खर्डेघाशी. 
                  मग इकडचा लाडू तिकडे करताना पडणार्या पाकळ्या खाऊन जगलेल्या कैद्याची गोष्ट मला आठवते. तेव्हा आपणही तेच करायचे ठरवून मी ट्रेडिंग आणि गुंतवणूक ह्या दोघांची सांगड घातली.
इथे येऊन माझा प्रवास सुरु झाला की गुंतवणूक योग्य मार्केटमध्ये ट्रेडिंग योग्य मार्केटमधून पैसे कमवायचे आणि गुंतवत राहायचे. आता मी जी पद्धत अवलंबली त्यात पैसे हळू हळू मिळतात कारण मी ही मराठीच सुरक्षितता आधी.
                           मग नवीन नवीन सुरुवात  करणार्यांसाठी कशी सुरवात करावी किती पैसे लावावेत ? हे प्रश्न येतात (वास्तविक लावावेत असे विचारल्यावर विचारणार्याची मानसिकता कळते कि आज तंगडी येणार कि बंगला ह्या पद्धतीने तो मार्केट कडे हि जुगार म्हणूनच बघतोय मग त्याला सांगावे लागते "बाला ! जल्ला कवरे लाऊ नाय रे कवरे गुंतवू म्हण हं ) तर त्यावर माझे उत्तर हे की तुझ्याकडचे  पैसे १० वर्ष अडकून पडले तरी चालतील असे असतील तेवढे लाव किंवा भरपूर असतील तर तुझी उद्दिष्टे वगैरे ठरवून त्याप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने गुंतव. 
                        तुमचे पैसे ठरले आता शेअर्स कोणते घेऊ? शेअरची निवड करण्याआधी सेक्टर, इंडस्ट्रीजवगैरे समजून घ्या म्हणजे फार्मा सेक्टर,बँक सेक्टर वगैरे नंतर त्यातल्या कंपनीज. 
                    मला विचारले तर (म्हणजे होमियोपाथकडे जाऊन मी कुठली मुळी चोखाल्यावर बरे वाटेल हो....चुकतय हो ) मी म्हणेन बँक हा सेक्टर बेस्ट कारण तिथे जोखीम इतर कंपनींच्याबाबतीत असलेल्या जोखमीपेक्षा कमी असते. (मी फार ढोबळपणाने इथे हे लिहितोय ह्यावरचे विवेचन मी नंतर करीनच ). पण एखादा माणूस फार्मा सेक्टर मध्येच कामाला असेल किंवा ज्या सेक्टर मध्ये कामाला असेल त्याच सेक्टरचा विचार त्याने करावा कारण त्याला त्यात अधिक माहिती असण्याचा संभव आहे. मी वाणिज्य म्हणजे व्यापार करणार आणि व्यापाराच्या खेळात लहान असल्यापासून बँक बनून बाजूला बसणेच आवडत आले आहे.(दुसर्या शब्दात महाआळशी प्राणी )
                          आता एखादी बँक ठरली तर थोडा अभ्यास करा कसला ? किमतीतले चढ उतार कमीत कमी गेल्या ३ महिन्यांचे आणि.......

१) जर १० शेअर्स घेणार असाल तर २ च घ्या आणि हळू हळू घेत १० पूर्ण करा आणि लिहून ठेवा  कितीला पडले ते म्हणजे ब्रोकरेज वगैरे सगळे मिळवून उदा. रु. १०० ला एखादा शेअर घेतला तर १०० * १० = १०००/-  आता ह्यच्या १०% शेअर्स सरळ डीमेट करा म्हणजे ९ राहिले आता १०००/९ = १११ भाव आल्यावर तुम्ही ९ शेअर्स पूर्ण विकून टाका जमलेला १ शेअर तुमच्याकडे नाहीच असे समजून  डीमेटला पडला राहू देत जेव्हा जेव्हा डीमेट स्टेटमेन्ट येईल तेव्हा तो त्यातला फक्त आणि फक्त प्रोफीटच दाखवेल. जर भाव १११ आलाच नाही तर...तर तुमचा अभ्यास कमी पडतोय. अभ्यास वाढवा हेच त्याला उत्तर आहे कारण तुम्ही जरी १११ ला भाव नाही गेला तरी शेअर्स लाभांश देईलच म्हणून थांबू शकता त्याचा दुष्परिणाम म्हणजे ट्रेडिंग बंद. (पुन्हा स्वातंत्र्योत्तर काळात......सुरु )

२) रोज एका बँकेचा एकाच शेअर घ्या त्यासाठी भाव पाहू नका, अभ्यास करू नका आणि वर्ष संपल्यावर किंवा चांगला परतावा मिळेल (३६% वर्षाला....मारवाडी म्हणतो )तेव्हा बाहेर पडा.

 ३) आता  जानेवारी ते मे  सुगीचा काळ आहे मिळणाऱ्या लाभांशावर नजर ठेऊन आणि आपले भांडवल लक्षात घेऊन थोडा अभ्यास करून लाभांश देणारे शेअर्स घ्या आणि येणारा लाभांश परत त्याच कंपनीत गुंतवत राहा. (माझा १४ वर्षाचा मुलगा हेच करतो आणि लाभांशाच्या रुपात पैसे पासबुकात वाढलेले दिसले कि जो आनंद मी त्याच्या चेहऱ्यावर पाहतो तो अवर्णनीय आहे.)



(ढिशक्लेमर : वरील लिखाण ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. प्रेमभंग झालेल्यांनी....म्हणजे मार्केट मध्ये पोळलेल्यानी लांब राहावे किंवा बोध घ्यावा )

डे ट्रेडिंग.

किती हि तोटा झाला तरी सगळ्या ट्रेडर्सचा जिव्हाळ्याचा विषय. तेव्हा डे ट्रेड करावा की नाही ? हा प्रश्न तितकासा महत्वाचा नाही त्यांना ज्यांना करायचाच असतो त्यांना. पण मग कसा करावा हा डे ट्रेड.

चला, शोधून काढू.

प्रथम कोणत्या शेअर मध्ये डे ट्रेड करावा त्याचे दोन नियम आहेत.

१)  ज्याचा व्हॉल्यूम अवरेज ५००००० आहे असा कोणताही शेअर. त्याच बरोबर
२) ज्याची वर खाली करण्याची शक्ती (व्होलाटेलीटी )किंवा स्प्रेड (हाय - वजा - लो ) भरपूर आहे.
     उदा. एस बी आय... आय सी आय सी आय

१)   आता त्याचे आदल्या दिवशीचे हाय आणि लो घेऊन त्यांची बेरीज करा त्याला २ ने भागा.
      जो मध्य येईल त्याच्यावर किंवा खाली तुम्ही बाय किंवा सेल करावयाचे आहे.
      त्या आधी ट्रेंड शोधणे आले.

२)     ट्रेंड कसा ओळखायचा?
         तर ज्या दिवशीचे हाय आणि लो घेतले त्याच दिवशीचा क्लोज तपासा.
         म्हणजे तो जर तुम्ही काढलेल्या मध्याच्या आणि वेटेड अवरेजच्या खाली आहे कि वर ?
         जर वर तर अप ट्रेंड आणि खाली तर डाऊन ट्रेंड.
         जर क्लोज मध्य आणि वेटेड अवरेज्च्या मध्ये असेल तर शांत बसा कारण केव्हाही ट्रेंड ठरू शकतो                  आणि तेव्हा नेमके तुम्ही पोझिशन मध्ये असाल तर......असो. (शुभ बोल नार्या)

३)    शेअरचा मध्य काढलात, ट्रेंड ओळखलात आता प्रत्यक्ष ट्रेडिंग.

         आदल्या दिवशीच्या हाय आणि लोमुळे तुम्हाला ट्रेंड कळला आहे.
    आता बाय कितीला?
         जर अप ट्रेंड आसेल तर तो आदल्या दिवशीच्या लो ला पुन्हा स्पर्श करणार नाही मग तुम्ही काढलेला                मध्य आणि वेटेड अवरेज ह्या पैकी जे खाली असेल त्याच्यात  आदल्या दिवशीचा लो मिळवून आजून               एक मध्य काढा  तो तुमचा बाय.
    आता सेल कितीला ?
          जर डाऊन ट्रेंड असेल तर तो आदल्या दिवशीच्या हायला स्पर्श करणार नाही मग तुम्ही काढलेल्या                   मध्य आणि वेटेड अवरेज ह्यापैकी जे वर असेल त्याच्यात आदल्या दिवशीचा हाय मिळवून अजून एक             मध्य काढा तो तुमचा सेल.


उदाहरणार्थ
स्टेट  बँक ऑफ इंडिया

दिनांक                ओपेन         हाय          लो            क्लोज              वेटेड अवरेज   मध्य१(हा+लो /२)
३ /१२/२०१३         १८१२.२०     १८२९.४०  १८०८.८     १८१४.३५        १८१५.९३        १८१७.१० 
४/१२/२०१३          १८०५          १८३४.७० १७९६.४     १८१९.७०        १८१५.४५        १८१५.५५  

इथे ३/१२ ला क्लोज वे.अ. आणि मध्य ह्याच्या खाली आहे. जर बाय करायचे तर १८१२.३६ आणि सेल करायचे तर १८२३.२५  
तसेच एस बी आय ने ट्रेंड बदलला आहे.तुम्ही ५ /१२/२०१३ चे डीटेल्स लक्षात घ्या 
आणि तपासून इथे मांडा.

(ढिशक्लेमर : लेखक फक्त वरील पद्धत निदर्शनास आणू इच्छितो.बाकी निर्णय ज्याचा त्याने आपल्या                                   अभ्यासाने घ्यावा. लेखक ह्यास जबाबदार नाही.)





Thursday 7 November 2013

आयुष्याचे चतकोर.....

पाश्चिमात्यांनी अर्थक्षेत्र चार भागात विभागले आहे
  • नोकरी             (EMPLOYEE)
  • स्वयंरोजगारी  (SELF EMPLOYED)
  • व्यवसाय         (BUSINESS OWNER)
  • गुंतवणूकदार   (INVESTOR)


आपण म्हणतो 
  • उत्तम शेती
  • मध्यम व्यापार
  • कनिष्ठ नोकरी 

म्हणजे गुंतवणूकदार हा दोन्ही ठिकाणी सर्वोत्तम मानला जातो आणि नोकरी करणारा कनिष्ठ. पण उत्तम असो कि कनिष्ठ आपल्यापैकी प्रत्येकजण आर्थिक सुरक्षेची इच्छा बाळगतो आणि आर्थिक स्वातंत्र्याची स्वप्न पाहतो . वर दिलेले आर्थिक स्त्रोत जर आपण समजून घेतले तर आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्याचा प्रवास करण्यास दिशा मिळेल. 

थोडक्यात बिझिनेस जगातील व्यक्ती ह्या वरील चार विभागात विभागल्या गेल्या आहेत.
  1. नोकरी करणाऱ्याकडे नोकरी आहे.
  2. स्वयंरोजगार करणारा हा त्या रोजगाराचा मालक असतो.
  3. धंदा करणारा हा एका पैसा मिळवून देणाऱ्या सिस्टिमचा मालक असतो 
  4. गुंतवणूकदार हा पैश्यालाच आपल्यासाठी कामाला लावतो.
थोडक्यात शेत जमीन हे भांडवल ज्याचे आहे तो  धान्य पिकवण्यासाठी नोकर ठेवतो आणि पिकलेले धान्य व्यापारी शेत जमीनदाराकडून विकत घेऊन त्याने तयार केलेल्या विक्री व्यवस्थेमार्फत विकतो. (त्यामुळे जमीनदार वाड्यावर मजा मारायला मोकळे....असो)
  1.  आता आपण कुठे आहोत हे ज्याने त्याने पाहणे महत्वाचे आहे : त्यासाठी आपल्या कमाईचा मुख्य स्त्रोत कोणता ते लक्षात घेणे हि पहिली पायरी ठरते. हि पायरी आपला अंतर्गत वैचारिक फरक, जीवन विषयक मुल्ये, जन्म ज्या घरात आणि आर्थिक स्तरात झाला तो स्तर, तसेच स्वतःची जीवनाकडे बघण्याची दृष्टी ई. अनेक ज्ञात अज्ञात विषयांनी ठरते.
  2. मला कुठे असायला हवे : पारंपारिक शिक्षण हे नोकरदार किंवा उच्च उत्पन्न गटातले स्वयं रोजगारी व्यक्तींना (डॉक्टर,वकील, सी एज )जन्म देते. ह्यात काहीच गैर नाही जो पर्यंत तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्याची गरज वाटत नाही. आर्थिक स्वातंत्र्य ह्या गटाला क्वचितच मिळते. 
  3. आर्थिक स्वातंत्र्य हवेच आहे कि नाही ते ठरवा :    जास्तीत जास्त "जिवंत" आयुष्य जगणे हाच जीवनाचा मुख्य उद्देश आहे.  त्यासाठी  वेळेचे स्वातंत्र्य हवे पर्यायाने पैशाचेहि स्वातंत्र्य हवे. म्हणजेच "आर्थिक" आणि "स्वातंत्र्य" हे हातात हात घालूनच येतात. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे तुमच्याकडे पुरेशी संपत्ती (पैशाचा ओघ आणि असेटस )असणे जिच्या जोरावर तुम्ही जास्त शांत आणि स्वतंत्र जीवन जगू शकता (आर्थिक चिंतामुक्त ).
आता ठरवा आपण कुठे आहोत ते.









Wednesday 6 November 2013

अर्थक्षेत्र....एक उपेक्षित क्षेत्र

                                     दिवाळी ते मे महिना कसली नि कसली शिबिरे चालू असतात. व्यक्तिमत्व विकास शिबीर, क्रिकेट शिबीर, टेनिस शिबीर, तबला पेटी नृत्य गायन ह्याचा रतीब चालूच असतो म्हणजे पर्यायाने खेळ गायन पाककृती कलादालन वगैरे बरेच काही विषय पैसे देऊन हाताळले जातात. बरे पालक पण किती चोखंदळ असतात देव जाणे कारण शेजारचा जातो म्हणून माझा जातो इथपासून ते "आहो तेवढाच आम्हाला मोकळा वेळ मिळतो!!" पर्यंतची मुक्ताफळे मी पालकांकडून ऐकत आलो आहे. म्हणजे कुठलीही कला येणे खेळ येणे वाईट नाही पण आयुष्यात अनेक महत्वाचे जे संस्कार आहेत त्यातही आर्थिक साक्षरता हा महत्वाचा संस्कार आपण मुलांना देतो का? 
                                      ६३ वर्षाचे माझे एक क्लायंट मला सांगतात "अरे मुलाला वेळच नाही त्याची सगळी गुंतवणूक / करविषयक बाबींकडे मला आणि त्याची मुले माझ्या हिला सांभाळावी लागतात. " (आजी आजोबांचे प्रेम वगैरे ठीक आहे रे पण आम्ही मोकळे होणार कधी ?) आणि कहर असा कि सुनेची गुंतवणूक विषयक आणि करविषयक व्यवस्था तिचे वडील पाहतात जे माझेच क्लायंट आहेत. हे पाहून खूप त्रास होतो बरे दोन्ही कुटुंबे सु-शिक्षित आहेत आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत पण तरीही खूपशा गोष्टी जेव्हा माझ्याबरोबर शेअर होतात तेव्हा वेदना होतात कारण दोष कुणाचा हे कळते पण सांगणे कठीण जाते.
                                      माझे आईवडील फारसे शिकलेले नव्हते त्यांनी उरापोटावर मेहनत करून आणि आपल्या आवडीनिवडी बाजूला सारून (हे कर्म कठीण असते असा माझा वैयक्तिक अनुभव आहे) आम्हाला शिकवले कारण त्यांना शिक्षणाचे महत्व कळले होते. आजच्या पिढीकडे शिक्षण आणि पैसा दोन्ही आहे मग त्यांनी मुलांना काय आणि कोणत्या वयात दिले पाहिजे (वयावरून आठवले लैंगिक शिक्षणाचादेखील उहापोह चालूच असतो सर्व माध्यमातून!!)असा प्रश्न तुम्हालाही पडतो का?
                                      आर्थिक साक्षरता हा एक महत्वाचा भाग आहे आणि तो संस्कारक्षम वयातच शिकवला पाहिजे. चेक बुक, पे in स्लीप, घराचे बजेट, शाळेसाठी, वाढदिवसासाठी केलेला खर्चाचे टिपण मुलांनी ठेवायला सुरुवात केलीतर त्यात हळूहळू त्यांना गोडी निर्माण होते असे मी पहिले आहे. बँकिंग चालते कसे? पैसे येतात कसे? नोकरीच केलीतर पैसे येतात कि आणखीहि काही मार्ग आहेत त्यातले वैध आणि अवैध कोणते ते कसे ओळखायचे त्याबाबतीत काय कायदे आहेत. तुम्ही कंपनीत जॉब करता त्याचा ओनर कुठे नोकरी करतो ? एक ना हजार भरपूर प्रश्न लहान मुले विचारतात आणि आपल्याला आपली पातळी दाखवून देतात. बाबा तुम्ही बिल गेट का नाही? तुम्हीहि सोफ्टवेरच बनवता ना?
                                   मुलांनी कुठले प्रश्न विचारावेत हे आपण च्येनालैझ करू शकतो जर टी.वी आणि अवांतर मधून आपण बाहेर पडलो आणि मुलांकडे, त्यांचे फोकस तयार करण्याकडे लक्क्ष देऊ लागलो तर.
                                      सर्व इतर क्षेत्रांप्रमाणे अर्थक्षेत्र हे हि एक उपयुक्त क्षेत्र आहे. त्यातहि क्रिएटिव्ह, happpening असे भरपूर काही आहे पण दुर्दैवाने दुर्लक्षित आहे. वयाच्या तिशीला माझा मुलगा आणि परक्याकडे जाणारी माझी मुलगी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि साक्षर व्हावेत हे एकच ध्येय असावे कि .........दुसरा काही ऑप्शन आहे ????

हे सर्व लिहिण्यामागचे कारण एवढेच कि जे माझ्या आजूबाजूला आहे तेच तुमच्या आजूबाजूला आहे का?
Become a Go Daddy Reseller!